Tuesday, 19 March 2019

मनसे समर्थकाचं पक्षाध्यक्ष राजसाहेबांना खुलं पत्र

"                              9 मार्च २॰॰६ रोजी राज ठाकरे नावाच्या ऐका तरूण नेत्याने बाळासाहेबांच्या आधिपत्याखाली असणार्‍या शिवसेनेसारख्या प्रस्थापित पक्षाला रामराम ठोकून ,स्वतःचा नवा पक्ष ऊघडण्याचं धारिष्ट्र्य केलं आणि त्यांच्याबरोबरंच माझ्यासारखे अनेक तरूण या नवीन पक्षात भरपूर अपेक्षांचं ओझं घेऊन सामील झाले...
                              या नवीन पक्षाची मतं जगजाहीर होती,चाळीस वर्षांपूर्वी बाळासाहेबांनी मराठीच्या ज्या मुद्याभोवती राजकारण करून शिवसेना ऊभारली, त्याच मुद्याकडे नंतर सेनेचं काही कारणास्तव दुर्लक्ष झालं..पण मराठीचा मुद्दा मात्र महाराष्ट्रात अगदी तसाच होता, किंबहूना त्याहून अधिक प्रखर झाला होता...राजसाहेबांसारख्या चाणाक्ष राजकारण्याने हे हेरून त्याभोवती आपल्या नवीन पक्षाची ऊभारणी केली आणि त्यात अल्पावधीत त्यांना यशही आलं...
                              सुरूवातीच्या काही काळात पक्षाला मिळालेला प्रतिसादही तितकाच ऊत्स्फूर्त होता..पक्षाध्यक्ष श्रीयुत राजसाहेबांची शिवतीर्थावरील पहिली जाहीर सभा आजवरच्या स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वोच्च गर्दी जमवणार्‍या सभांपैकी ऐक मानली जाते...नंतरच्याही प्रत्येक सभेला व त्यातील प्रत्येक भूमिकेला लोकांनी ऊत्स्फूर्त प्रतिसाद दिला..टोलविरोधातील आंदोलन असो, अथवा रेल्वे भरतीमधील परप्रांतियांविरोधातील आंदोलन असो, मनसेची ताकद लोकांनी रस्त्यावर पाहिली आणि पहिल्याच विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १३ आमदार निवडून आले...अगदी पहिल्या लोकसभा निवडणुकीत जरी पक्षाचा खासदार निवडून आला नसला, तरी पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी विलक्षण होती आणि मनसेने राजकारणाची सारी गणितं बिघडवून टाकली
                                     मात्र मागील लोकसभा निवडणूकीत आलेल्या मोदीलाटेत ईतर प्रादेशीक राजकीय पक्षांसारखीच मनसेची अक्षरशः वाताहत झाली आणि मग त्यानंतर हा पक्ष पुन्हा मार्गावर येऊच शकला नाही...वास्तविक पाहता नरेंन्द्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना,मोदींसारखा नेता देशाला पंतप्रधान म्हणून लाभावा, अशी मागणी सर्वप्रथम स्वतः राजसाहेबांनीच केली,पण नंतरच्या राजकीय समीकरणांनुसार मात्र त्यांनी मोदींना विरोध करण्यातंच धन्यता मानली ...पण स्वतःचं राजकीय अस्तित्व जपण्यासाठी त्यांना मोदींना विरोध करणं गरजेचं होतं किंवा आहे...माझ्यापद्धतीने याची मी केलेली मीमांसा खाली मांडतोय...बघा पटतेय का...!!
                                     शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांना मतदान करणारा मतदार कमी अधिक प्रमाणात ऐकंच आहे..या दोन्ही पक्षांमधील कोणत्याही ऐका पक्षाला जर महाराष्ट्रात पुढे जायचं असेल, तर ते दुसर्‍या पक्षाच्या छाताडावर पाय रोवूनंच पुढे जावं लागेल...भाजपा आणि शिवसेना हिंदूत्वाचे राजकारण करीत असल्याने तात्पुरत्या स्वरुपात का असेना ,पण ऐकमेकांना  नैसर्गिकरीत्या पूरक मॅच आहेत( Natural Match ). शिवाय मनसेची ऊत्तर भारतीयांविरोधातील भूमिका भाजपाला देशाच्या राजकारणात त्रासदायंक ठरू शकते...त्यामुळे भाजपा मनसेसोबंत जाणं कदापी शक्य नाही आणि मनसेला जर भाजपा - शिवसेनेला मागे लोटून स्वतःचं वेगळं अस्तित्व तयार करावयाचं असेल, तर मग भाजपा आणि पर्यायाने मोदींविरोधात बोलावंच लागेल...
                                   पण आजवर ऐकला चलो रे असं म्हणून स्वतःच्या ताकदीवर चाललेली मनसेची घोडदौड अगदी कालपरवापर्यंत खरंच वाखाणण्याजोगी होती..काॅंग्रेस आणि भाजपा दोघांविरोधात गर्जणारी मुलूखमैदानी तोफ म्हणून राजसाहेबांची ख्याती अख्या महाराष्ट्रातंच नाही तर संपूर्ण भारतात होती आणि अगदी आजही आहे,पण लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने पवार साहेबांच्या पुढाकाराने मनसे पहिल्यांदाच मोदीविरोधी आघाडीत सामील होते की काय अशी धुसर शक्यता निर्माण झाली आणि मग सरतेशेवटी काॅंग्रेसने नकार दिल्याने मनसे आघाडीतून बाहेर झाल्याची बातमी आली..मग लगेचंच दोन दिवसांनी मनसेनेही आपण लोकसभा लढविणार नसल्याची जाहीर घोषणा करून टाकली आणि सार्‍या...
                                 ऐकंदरीत मागील दोन तीन वर्षांमधील पक्षाची मार्गक्रमणा पाहता हा पक्ष आपल्या मूळ रस्त्यापासून भरकटंत चालला आहे, हे सांगायला कोण्या राजकीय विश्लेषकाची अजिबात गरंज नाहिये..,मग ती विरोधाला विरोध म्हणून सर्जिकल स्ट्राईक वर शंका ऊपस्थित करण्याची भूमिका असोत ,वा आजवर काॅंग्रेसला व त्यांच्या भूमिकेला केलेला विरोध विसरून आघाडीत जाण्यासाठी केलेली वैचारीक तडजोड असोत...त्यातंच आधी मुंबई महानगरपालिकेतील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत केलेला जाहीर पक्षप्रवेश आणि निवडून आलेल्या ऐकुलत्या आमदाराने पक्ष सोडून पक्षनेत्रुत्वावर दाखविलेला अविश्वास यावरून मनसे अगदीच बिकंट परिस्थितीतून मार्गक्रमणा करीत असल्याचा प्रत्यय  येतो...
                                     असो संकटं येतात,संकटं जातात,नेते कार्यकर्ते येतात जातात, पक्ष मात्र आपल्या जागी ठाम असतो...राजसाहेब जातीपातीचं ,धर्माचं राजकारण न करता,केवळी मराठी जनांच्या हितासाठी झटणारा ऐक लढवय्या नेता म्हणून आम्ही सर्वजण आपल्याला ओळखतो...क्रुपया मतांसाठी स्वतःच्या आणि पक्षाच्या तत्वांशी तडजोड करू नका..कारण तडजोडी तात्पुरत्या असतात ,पक्षाला दीर्घकालीन वाटचालीसाठी तडजोडी नाही, तर पक्षाची ध्येयधोरणेच कामी येतील....येणारी लोकसभा न लढविण्याचा आपला निर्णय मनसैनिकांसाठी अतिशय निराशाजनंक असला तरीही आम्ही अजूनही आशा सोडलेली नाही...येणार्‍या विधानसभा निवडणुकीत आपण पूर्ण ताकदीनिशी ऊतरून निवडणुकीचं मैदान मारावं व आपल्या हातून या महाराष्ट्राचं व पर्यायाने मराठी माणसाचं भलं व्हावं हीच माफंक अपेक्षा...
                                             


                                         -©- निरागस


                                   
                                    
                             

Thursday, 14 March 2019

आगतिक महिला दिन

"                                   शिक्षणानिमित्त राजस्थानमधे तीन वर्ष राहण्याचा अनुभव घेता आला,त्यात मी पडलो स्त्रीरोगतज्ञ त्यामुळे मग त्यातल्या त्यात ईतर सहकार्‍यांपेक्षा माझा तेथील महिलांशी जास्त संबंध आला...त्यातलीच काही प्रासंगिक निरीक्षणे ईथे मांडतोय....
                                   वसुंधराराजे यांच्यारूपाने राजस्थानला महिला मुख्यमंत्री मिळाला असला, तरी ईथल्या महिलांची अवस्था गोठ्यात बांधलेल्या गुरांपेक्षा काही वेगळी नाही...घरातील कोणत्याही निर्णयांमधे  महिलांना विचारात घेतलं जात नाही..चूल आणि मूल याव्यतिरिक्त देखील महिलांची ऊपयुक्तता असू शकते, यावर येथील सुशिक्षित पुरूषांचादेखील विश्वास नाही,बाकी न शिकलेल्यांबद्दल काही न बोललेलंच बरं.. .
                                   बर्‍याचदा घरातला पुरूष ऐकटाच ओपीडीत येऊन महिलांच्या आजारपणाविषयी विचारपूस करून जायचा,मग कधीतरी महिन्या दोन महिन्यांनी ऐखाद्या सुट्टीच्या दिवशी ऐखादी मोठाली गाडी करून घरातील व आजूबाजूच्या सगळ्या महिलांना ऐकत्र करून दवाखान्यात आणलं जायचं..तोपर्यंत सगळ्यांनी आपापली आजारपणं तशीच सहन करायची...अगदी सुरूवातीलाच सांगितलं जायचं फुकटात होईल तितकेच ऊपचार करा...त्यातून ऐखादीला काही मोठं आजारपण निघालंच ,तर सरळ त्या महिलेला तिच्या आई-वडिलांकडे पाठवलं जायचं आणि प्रसंगी मुलग्याचं दुसरं लग्न लावून दिलं जायचं,म्हणजे आजारपणासाठी लागणारे  पैसेही वाचायचे आणि नवीन लग्नात भरभक्कम हुंडाही घेता यायचा....
                                  आजकाल आपल्या देशात बालविवाह होत नाहीत असा गोड गैरसमज बाळगून असणार्‍यांनी फक्त ऐकदा माझ्यासोबंत राजस्थानला यावं...अगदी वीस ,बावीसाव्या वर्षी तीन चार मुलांना जन्म देऊन गर्भपिशवी काढून टाकावयास आलेल्या असंख्य महिलांना पाहून कित्यैकवेळा माझं डोकं सुन्न झालेलं आहे,तर कित्येकवेळा मी अक्षरश: ढसाढसा रडलोदेखील आहे..
                                 बाजारात जाऊन क्रोसीनची गोळी घेणं जितकं सोप्पं आहे अगदी त्याच सहजतेने राजस्थानमधे लोकं गर्भपिषवी आॅपरेशन करवून घेण्यासाठी दवाखान्यात येतात...गर्भपिशवी काढणे ही आणि हीच ऐकमेव गर्भनिरोधंनाची पद्धत ईथल्या लोकांना माहिती आहे आणि यात सुशिक्षित अशिक्षित असा काही फरंक होत नसतो...सगळे ऐकजात ऐका माळेचे मणी..सूज्ञ डाॅक्टर म्हणून तुम्ही जर त्यास नकार दिलात तर ईतर दहा डाॅक्टर तीच शस्त्रक्रिया तुमच्यापेक्षा कमी दरात करून मोकळे होतात..घुंघट घेतल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही,घरातील पुरूष मंडळी जेवल्याशिवाय आपण जेवायचं नाही या असल्या वातावरणात राजस्थानातील या स्रिया आपलं आयुष्य जगताहेत..
                                कुणीऐक निर्मला सितारामण संरक्षणमत्री झाली म्हणून,कुणीऐक प्रतिभाताई राष्ट्रपती झाली म्हणून आणि कुणीऐक ईंदिरा या देशाची पंतप्रधान झाली म्हणून शर्टाची काॅलर वर करून खूष होणारे आपण राजस्थानसारख्या कित्येक राज्यांमधे होणारी महिलांची कुचंबणा सोयीस्कररीत्या विसरून जातो...निर्मला सितारामण संरक्षणमंत्री होण्यापेक्षा या सार्‍या महिलांना घरात मिळणारी सापत्न वागणूक बंद व्हायला हवी...कारण  महिला राष्ट्रपती असोत वा संरक्षणमंत्री या आमच्या भारतीय महिलांच्या हलाखीचं प्रतिनिधित्व करीत नाहीत...बोलण्यासारखं वा लिहिण्यासारखं खूप काही आहे,पण आता नुसतं लिहून अथवा बोलूनही चालणार नाही...प्रत्यैकाने आपापल्या घरातल्या,आॅफीसातल्या आणि संपर्कातल्या महिलांच्या सशक्तीकरणासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे...
                                            

                   
                      -©- निरागस