Thursday, 4 June 2020

आणखी काय बोलू मी तुझ्याबद्दल ???



                             आणखी काय बोलू मी तुझ्याबद्दल ???




रिमझिम  पावसात दरवळणारा मातीचा सुगंध म्हणजे तू 
कोऱ्या कागदावर मी शाईने खरडलेला एकमेव निबंध म्हणजे तू 

हृदया भोवती  करकचून आवळलेला मायेचा पाश म्हणजे तू 
माझं अवघं आयुष्य व्यापून टाकणारं निळंशार आकाश म्हणजे  तू 

दिवाळसणात पणत्यांमुळे आलेली अद्वितीय रंगत म्हणजे  तू 
पावसाळी ढगांना झालेली सोसाट्याच्या वाऱ्याची संगत म्हणजे तू 

नदीनाल्यातुन घरंगळणाऱ्या पाण्याच्या नशिबातील ठेहराव म्हणजे तू 
उचंबळून येणाऱ्या भाव भावनांनी मनात घातलेला लपंडाव म्हणजे तू 

बंदिस्त नयनपटलांवर एकाएक उमटलेला सुमधुर आभास म्हणजे  तू 
गहिवरून मार्गस्थ झालेल्या अश्रूंनी नकळत दाखवलेला विश्वास म्हणजे तू 

स्वच्छ तू नितळ तू मंदिराच्या कातळावरील विलक्षण नक्षी म्हणजे तू 
पाठमोऱ्या चालणाऱ्या मला दूरवर एकटक पाहणारी कामाक्षी म्हणजेही तूच तू 



                                - © - निरागस 







                    

1 comment:

  1. खूपच गोड कविता. तुमचं प्रेम अमर असो.

    ReplyDelete