Saturday, 17 December 2016

"..अंतरंगाचा शोध.."

..प्रुथ्वीची ऊत्पत्ती झाल्यानंतर हजारो लाखो वर्ष पशुपक्षी , जीवजंतु खुष होते कारण माणुसरुपी प्राणी अजून या प्रुथ्वीवर अवतरला नव्हता...माणसाच्या ऊत्पत्तीच्या अनेक भाकडकथा सांगितल्या जातात...कुणी म्हणतं मनु नावाच्या माणसापासून संपुर्ण मनुष्यजातीची ऊत्पत्ती झाली..कुणी म्हणतं अॅडम आणि ईव्ह ही पहिली सुरुवात..कुणाचं काय तर कुणाचं काय...ऊचलली जीभ लावली टाळ्याला...
यातलं काहीहि झालेलं नसणार...मनुष्यसद्रुष्य प्राण्याची ऊत्क्रांती होत होत तयार झालेली माणसाची ही जमात आणि हेच त्रिकालाबाधित सत्य आहे..
                तर दोन माणसं एकत्र रहायला लागली...नावं घेऊन एकमेकाला बोलवायची पद्घत फार अलीकडची आहे त्यामुळे अॅडम ईव्ह किंवा मनु किंवा ईतरकाही नावं असण्याची सुतराम शक्यता नाही...तर दिसायला तुमच्या आमच्यासारखीच दोन  माणसं एकत्र रहायला लागली..एक पुरुष आणि दुसरी स्त्री...आणि आज हा जो काही मानवजातीचा प्रपंच ऊभा आहे हा केवळ त्यांच्यात ऊद्भवलेल्या नैसर्गिक आकर्षणातून तयार झालेला आहे....
                  पण सुरुवातीला जेंव्हा संख्या कमी होती त्यावेळी सगळेच जणं एकत्र राहत होते कारण सगळ्यांसमोरच्या समस्या कमीअधिक प्रमाणात सारख्याच होत्या.. पुढे हळू हळू संख्या वाढू लागली तशी  प्रत्येक गोष्टीत जीवघेणी स्पर्धा आणि पराकोटीचा संघर्ष सुरु झाला...आजच्यासारख्या अभ्यासाच्या परीक्षा नसतीलही त्याकाळात, परंतु पोटात रोज किमान तीन वेळा ऊठणारा पोटशूळ आणि वासनेसारख्या नैसर्गिक भावना  पुरातन काळातदेखील होत्याच...आणि मग त्यातूनच होणारा तो struggle for existence...मग त्यात बलवान आले दुर्बल आले..मग बलवानांनी दुर्बलांचं शोषण नाही केलं तरंच नवल..
                        आजच्या काळातदेखील लाखो गोष्टींची ऊकल आपल्याला होत नाही...करोडो वर्षांपुर्वीदेखील ह्या अशा मानवी आकलनापलीकडच्या हजारो गोष्टी असणार आणि मग अशा गोष्टींच्या अस्तित्वासमोर हतबल होऊन पराभूत मनस्थितीने त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन त्यांना दैवत्व दिलं गेलं...आता कुणाला सूर्यासमोर नतमस्तक व्हावं वाटलं तर कुणाला दगडामधे देव दिसला तर कुणी मानवी अवतारात देव शोधला...काय फरक पडतो..?? कारण सगळंच खोटं होतं किंवा आहे...
                    सुरुवातीला ही देव नावाची संकल्पना मानवी मनाला ऊभारी देणारी अनाकलनीय शक्ती म्हणून रूजवली गेली असणार पण नंतर काळाच्या ओघात तिचा बाजार झाला...शेवटी माणूसपण यातच आहे नाही का..?? मग माझा दगडातला देव तुमच्या माणसातल्या देवापेक्षा कसा मोठा आहे किंवा माझा माणसातला खोटा देव तुम्हा ईतर माणसांपेक्षा कसा श्रेष्ठ आहे याचे हेवेदावे सुरू झाले..धर्म तयार झाले,पंथ तयार झाले,देश विभागले गेले आणि नुकसान तुमचं आमचं झालं.भांडणं झाली,तंटे झाले,युद्ध झाली पण प्रश्न काही सुटेना कारण मानवानेच जन्माला घातलेला देव आज त्याच्यापेक्षाही वरचढ झाला होता मग ऊशीरा का होईना काही लोकांना समजून चुकलं की हे थोतांड आहे यात काही तथ्य नाही म्हणून त्यांनी देव वगैरे संकल्पनांना तडा देऊन नवीन पंथ स्थापले व आम्हीच कसे बरोबर व तुमच्या श्रद्घा कशा चुकीच्या हे सांगायला चालू केलं...म्हणजे पुन्हा तेच दुसर्‍याला स्वतःच्या मतांसमोर लाचार व्हायला लावणे...
                     जाताजाता सांगायचंच तर हिंदू,मुस्लिम,शीख,ख्रिश्चन या सर्व धर्मांमधे एकच साम्य आहे की हे सगळं धादांत खोटं आहे..लोकांच्या श्रद्धेचा बाजार मांडलाय सगळ्यांनीच..आमचाच देव खरा ईतर सगळे खोटे हे सांगणारे मूर्ख आणि त्यावर विश्वास ठेवणारे त्याहून अधिक मूर्ख..मी स्वतः गणपतीची आराधना करतो अगदी मनापासून पण तो माझा मित्र आहे..बोलतो माझ्याशी तो..त्याला प्रसन्न करण्यासाठी मी ऊगाच ऊपास तापास करत नाही किंवा तो ईतरांपेक्षा श्रेष्ठ आहे की नाही या वादातदेखील मी कधी पडत नाही...तुमची जिथे श्रद्धा जडलेय तिथे ती जरूर करा पण तिचा अतिरेक नको..ईतरांच्या श्रद्धेची निंदानालस्ती नको कारण हे आपण आपल्यासाठी बनवलंय आणि हे खोटं आहे...पुन्हा सांगतो हे खोटं आहे अगदी आटपाटनगरीत चौकट राजासारखं..स्वतःचा देव स्वतः शोधा आणि व्हा त्याचे भक्त पण तो ईतरांवर लादू नका..त्याला त्याचा देव स्वतः शोधूदेत...माणूस म्हणून जगा आईची आण घेऊन सांगतो खूप वाव आहे
                                        
                                       ©- निरागस


                

Wednesday, 14 December 2016

"..नाही मी विसरु शकत..."


" गावकुसाबाहेरची ती पडकी पण टुमदार ईमारत..
त्यामागे असलेलं ते भकास शिवार..

आणि त्या ईतक्या रौद्र वातावरणात माझ्यासाठी ताटकळत ऊभारलेली तू...
नाही मी विसरु शकत...


बांबूच्या झाडाला ऊलटा लटकणारा तो सस्तन प्राणी,
मधूनच भुंकणारं पाटलाचं ते कुत्रं..
तोंडावर अलगद येऊन धडकणारे ते गरम हवेचे झोत

आणि या सगळ्या जाचातून सुटका करणारं तुझं ते निखळ स्मित हास्य
नाही मी विसरु शकत....


सुकलेल्या गवतातून सगळ्यांच्या नकळत सरकत पुढे जाणारा तो कुरुप सरडा,
माझ्यासारखाच दुसर्‍यावर जीव ऊधळून आता निपचित पडलेला तो काळा कभिन्न पाषाण

आणि या सगळ्यांना वेठीस धरून  तुझ्या बोटांचा माझ्या बोटांशी चाललेला खेळ
नाही मी विसरु शकत..
.


ऊन्हातानात शेतात भांगलून करपलेला तुझा तो राकट देह...
मोठाले पण वेड लावणारे तुझे टपोरे डोळे... 

तुला एकटक न्याहाळणारा मी
आणि लाजेने शरमून खाली बघत हातातल्या काडीने मातीत वर्तुळं काढणारी तू
नाहीच मी विसरु शकत "

                             
                               ©-निरागस


Friday, 9 December 2016

..लगीनघाई..

                 मी नाही जात सहसा सार्वजनिक कार्यक्रमांमधे.कारण काही मोजके अपवाद वगळता सगळेच कार्यक्रम म्हणजे स्वतःच्या आर्थिक सुबत्तेचं ओंगाळवाणं प्रदर्शन करण्यासाठी मिळालेल्या संधीसारखे साजरे केले जातात..आणि त्यातली बहुधा सगळीच माणसं बोगस असतात..तरीही कधीमधी मित्रांच्या, आप्तेष्टांच्या आग्रहाखातर किंवा कधीकधी केवळ एक व्यावसाईक शिष्टाचार म्हणून तटस्थपणे राहतो ऊपस्थित.अशाच एका लग्नसमारंभात मागल्या बाकावर बसून केलेला लोकांचा  अभ्यास शब्दांत मांडण्याचा  हा प्रामाणिक प्रयत्न...
                     बेंदूर पोळ्याला सजवलेल्या बैलासारखे सजवलेले ते दोन जीव नवीन आयुष्याची सुरुवात करायला चालले होते..मुळात नवीन चांगल्या गोष्टीची सुरुवात ईतक्या गोंगाटातच का बरे करावी लागते...?? हेच मला कळत नाही..कुठेतरी शांत वाहणार्‍या नदीकाठी, निवडक मित्रांसमवेत, आईवडिलांच्या आशीर्वादानंतर सुर्यासमोर नतमस्तक होऊनदेखील ऊभयतांच्या आयुष्याची सुरुवात होऊच शकते की..?? पण हे असले स्वतःचे फाजील लाड केले नाहीत तर मग माणसात आणि त्या निष्पाप पशु पक्षांमधे अंतर तरी काय राहणार..?? असो...
                       मुलगी अधूनमधून मुलाकडे बघून काहीसं बोलायचा प्रयत्न करत होती आणि मुलग्याला मात्र ते काही केल्या ऊमगतंच नव्हतं..पण त्यांच्या त्या प्रसन्न मुद्रा बघून याची खात्री पटली की ते दोघेही खुष होते...कितीही कठीण वेळ आली तरी एकमेकांचा हात सोडणार नव्हते...निदान पहिल्या दिवशीतरी एकंदरीत हाच रागरंग दिसत होता...आणि कदाचित त्या संपूर्ण चार-पाचशे लोकांमधे ते दोघेच खुष होते...मनातल्या मनात त्यांना शुभेच्छा दिल्या आणि नजर फिरवली
                       स्टेजच्या एका कडेला दबक्या पावलाने चालणारा.डोक्यावरच्या टोपीने अधूनमधून आपला घाम पुसणारा आणि घाम पुसायच्या बहाण्याने सारखं घड्याळातील काट्यांकडे पाहणारा माणूस दिसला...आजच्या घडीला तो एकतर मुलीचा बाप असू शकतो किंवा घरात दडवून ठेवलेल्या कोट्यावधींच्या जुन्या नोटांची काळजी करणारा कोट्याधीश...दुसर्‍या विंगेत अंगात शुभ्र पांढरा सदरा आणि डोक्यात गांधी टोपी घातलेला एक माणूस सारखे काही हातवारे करत होता..ऊभ्या ऊभ्याच जणू त्याने एकहाती सगळा कार्यक्रम तोलून धरला होता..तो मुलग्याचा बाप असणार वेगळं सांगायलाच नको...बरोबर स्टेजच्या मध्यभागी बसलेले भटजीबुवा दिसले..मला यांचं प्रयोजन कळलंच नाहीये आजतागायत.. मीच काय ती प्रुथ्वीप्रदक्षिणा घालून आलोय आणि माझ्याव्यतिरिक्त  ईतर सगळे गाढव आहेत क्षुद्र आहेत अशा अविर्भावात असणारा यांचा वावर मला लहानपणापासून खटकतो.यांनी अख्या मनुष्यगण आणि देवगणाला वेठीस धरलंय असा माझा नुसता समज नाही तर द्रुढ समज आहै...पण मिळालेली जबाबदारी ते लिलया पार पाडत होते..मी बोलणार आहे त्यांच्याशी एकदिवस सविस्तर..निदान त्यांच्या घरात तरी सगळे खुष आहेत का..?? विचारावं म्हणतोय एकदा..
                          फिरत फिरत स्टेजवरुन खाली आली नजर तर नुसता किलकिलाट चालू होता..कुणालाही त्या लग्नाशी काहीहि देणघेणं नव्हतं..कुणी आपली नवीन घेतलेली साडी हाॅलमधल्या ईतरांपेक्षा वेगळी कशी आहे हे पटवून सांगत होतं..तर कुणी दागिन्यांवरच्या चर्चैत व्यस्त होतं...कुणाला जेवण आवडलं नव्हतं तर कुणाला पार्किंगच्या व्यवस्थेबाबत आक्षेप होते..कुणाला फोटोग्राफर पटला नव्हता तर कुणी sound system वर टीका करण्यात मग्न होता..सगळ्यांचा  मात्र demonitization वर  जास्त जोर होता..अगदी ईतिहासाचा शिक्षकदेखील नरेंद्र मोदींनी काय चुकवलं हे पटवून सांगत होता.. एकंदरित काय तर कुणीच खुष नव्हतं आणि ते नसतातचं कधी..त्यांचं तरी काय चुकलं ?? कारण हा  मानवी स्वभाव आहे...थोडक्यात सांगायचं तर कोणिही ऊस्फुर्तपणे आलेलं नव्हतं..प्रत्येकाची स्वतःची गणितं होती..आणि ईथं न आल्याशिवाय ती सुटणारी नव्हती..
                          तर अशा या मंगलकार्यात कोणी जबाबदारी पार पाडत होतं तर कुणी शिष्टाचार..कुणी जेवणाला प्राथमिकता देत होतं तर कुणी फोटो काढून घ्यायला..मग शेवटी डोळे मिटले आणि विचार केला..या असल्या फुटकंळ लोकांना बोलावणं खरंच गरजेचं असतं का..?? असं करुन कसं चालेल लोकं काय म्हणतील..?? तसं करुन कसं चालेल लोकं काय म्हणतील..?? हीच काय ती लोकं..?? यांच्यासाठीच जगायचं असतं का आयुष्यात..?? स्वतःची हौस,स्वतःची खोटी प्रतिष्ठा स्वतःच्या मुलांवर लादणार्‍या प्रत्येक आईवडिलांनी याचा खरंच खूप गांभीर्याने विचार करावा. वरणात मीठ जास्त पडलं म्हणून लग्न बरं होतं म्हणणार्‍या या लोकांना निदान माझ्या आयुष्यात तरी तिळमात्र स्थान नाही... 
                - निरागस