" दिवाळीचे दिवस असतात,घराघरांत फराळाची देवाणघेवाण सुरू असते..घरी आलेल्या आपल्या मित्रमैत्रीणींना,दूरच्या नातेवाईकांना फराळ खाऊ घालण्यात आपण व्यस्त असतो..ईतक्यात दारावरची बेल वाजते..कोण आलंय आत्ता ईतक्यात ?? असं म्हणून आपण दारावरच्या छिद्रातून डोकावून बघतो..रोजचं घरकाम करायला आलेली कामवाली मावशी दरवाजावर असते...दरवाजा ऊघडण्याआगोदर आपण घाईगडबडीने फराळाचे डबे बंद करतो..धावतपळत सगळैचजण स्वयंपाकघरात जातो...सगळं आवरून दरवाजा ऊघडतो , तर मावशी फार कौतुकाने घरून आणलेला फराळाचा डबा ऊघडून समोर धरतै....
अन् मान शरमेने खाली जाते...!!
घाईगडबडीत आॅफीसला जाता जाता बुटाला पाॅलीश करायचं राहून जातं..म्हणून रेल्वेस्थानकाजवळच्या फाटके कपडे घातलेल्या पोर्यासमोर आपण आपला पाय सरकावतो..तो पाॅलीश करत असतानाच, आता याला पाच रूपये सुट्टे कुठून द्यायचे..?? छे..!! आता गेली दहाची नोट..याचंच दुःख आपल्याला जास्त असतं..पाॅलीश संपल्यावर काहीसं निराश मनानेच आपण खिशात हात घालतो..आपली अडचण समजून तोच पोर्या समोरून आपल्याला म्हणतो,साहेब सुट्टे नसतील तर पुढील वेळी द्या....!! त्याचे ते शब्द कानात शिसंं ओतल्यासारखे आरपार खोलवर रूततात.
अन् मान शरमेने खाली जाते...!!
बापाबरोबर फिरायला म्हणून आपण घराबाहेर पडतो...चौकात आॅफिसातले चार ऊच्चभ्रू मित्र-मैत्रिणी आपल्याला भेटतात... कमी शिकलेल्या,पंचा नेसलेल्या आपल्या बापाची ओळख कशी करून द्यावी..?? या विवंचनेत आपण चार पावलं पुढे जाऊन, बापाकडे पाठ करून मित्रांशी बोलू लागतो..आपली झालेली ही पंचायत ओळखून..बाप आपल्या खिशातला रूमाल काढून आपल्याकडे येत म्हणतो,डाॅक्टरसाहेब हा तुमचा रूमाल खाली मातीत पडला होता...धन्यवाद ऐकायलादेखील न थांबता ,तो तडक तसाच पुढे निघून जातो...
अन् मान शरमेने खाली जाते...!!
बसची वाट बघंत आपण झाडाखाली ऊभे असतो.फोनवर बायकोशी बोलणं सुरू असतं..दोघेही आपापल्या नोकर्यांमधे व्यस्त असल्याने छोट्या लेकराला,पोटच्या गोळ्याला वसतिग्रुहात ठेवण्यासंबंधी चर्चा अंतिम टप्प्यात आलेली असते..अशीच बोलता बोलता नजर भिरभिरंत दूरवरच्या वीटभट्टीवर काम करणार्या माऊलीवर जाते..कापडात गुंडाळून पाठीला लटकावलेलं तिचं तान्हं मूल दिसतं..हातातला मोबाईल गळून पडतो..
अन् मान शरमेने खाली जाते...!!
निवडणुकीसाठी म्हणून सरकारने सोमवारची सुट्टी जाहीर केलेली असते..शनिवारची जादा सुट्टी घेऊन तीन दिवस आपण सहपरिवार फिरायला म्हणून जातो..सोमवारी परत येताना चौकातल्या शाळेसमोर , ऐंशी वर्षांचा लखवा मारलेला म्हातारा खुर्चीवर बसून मत टाकण्यासाठी रांगेत ऊभा असलेला आपल्याला दिसतो..आपण मागे वळून बायकोकडे बघतो..तीही नजर चुकवते..
अन् मान शरमेने खाली जाते...!!
ढाब्यावर जेवणासाठी म्हणून आपण गाडी थांबवतो..हात धुवून जेवण सुरू करणार ईतक्यात भूकेने व्याकूळ झालेला भिकारी, फार आशेने हात पुढे करतो..आपण रागाने शिव्यांची लाखोली वाहून त्याला हुसकावून लावतो..जेवण संपवून ऊरलेलं अन्न आपण शहाण्यासारखं कचरापेटीत टाकतो..बील भरून गाडीत बसताना , ऊगाच आपली नजर जाते..तोच भिकारी आपण फेकलेलं ऊष्टं अन्न कचरापेटीत हात घालून शोधून शोधून खात असतो...डोकं सुन्न होतं..
अन् मान शरमेने खाली जाते...!!
नुकतांच आपला वाढदिवस होऊन गेलेला असतो..परिस्थिती नसताना बापाकडे हट्ट करून,रडून,रूसून आपण चार-पाच हजार वसूल करतो, मित्रांना चांगल्या हाॅटेलात पार्टी देतो..मित्रांची वाहवा मिळवून घरी येऊन पायातले मोजे काढंत असतो , तर बाप नवीन साबणाच्या मागील बाजूस ,जुना अर्धवंट संपलेला साबण चिकटंवत असतो..स्वतःःचीच स्वतःःला लाज वाटू लागते..
अन् मान शरमेने खाली जाते...!!
( ता.क. - असे कित्येक हजारो अनुभव रोज आपल्याला येत असतात..माणूस म्हणून सम्रुद्घ करून जात असतात..आयुष्य म्हणजे शेवटी काय आहै..?? ते शिकवंत असतात...)
-©- निरागस