" साधारण दुपारचे दीडेक वाजले असतील,ओपीडीतील गर्दी संपतच आली होती,शेवटचा रूग्ण तपासून खुर्चीतून ऊठणार तेच दरवाजातून बाहेर लक्ष गेलं,हुबेहूब ऐकसारखे दिसणारे ,अंगात पांढरा झब्बा,पांढरी शुभ्र विजार घातलेले दोघेजण लगबगीने दवाखान्यात येत होते...अंगातील पेहरावावरूनंच कळंत होतं, की दूर कोणत्याशा छोट्या गावावरून आले असावेत...त्यातल्या ऐकाने लांबूनंच हात जोडला मीही मान डोलावली आणि पुन्हा खुर्चीत बसलो....
बसले दोघेही बाहेर बाकावर....त्यातल्या ऐकाने लगबगीने हातातल्या पिशवीमधून रिपोर्ट बाहेर काढले,डोक्यावरील गांधी टोपी काढून ,तिची घडी नीट करून पुन्हा डोक्यावर चढवली, खांद्यावरील पटक्याने कपाळावरील घाम पुसला व आत येण्याच्या ऊद्देशाने तो जागचा ऊठला...डोक्यावरील पांढर्या केसांवरून व ऐकंदरीत त्याचा असलेल्या वावर पाहून वयाने तो थोडासा मोठा वाटंत होता...त्याच्याबरोबरील दुसरा त्यामानाने अगदीच शांत बसून होता,काहीच बोलंत नव्हता..जणूकाही आयुष्याच्या लढाईत हार मानून निपचिप पडला होता...तोच रूग्ण असणार याची ऐव्हाना मला कल्पना आलीच होती...मी हातानेच आत येण्याबाबत खुणावलं तर दोघेही दबकंत दबकंत आत आले....
म्हटलं बोला कसं येणं झालं...तर त्यातल्या मोठ्याने हातातील रिपोर्ट अलगद पुढे सरकावले व म्हणाला सर सगळ्या तपासण्या केल्या,नानाविध प्रकारची औषधे करून झाली पण अजिबात काहीही गुण नाही आला...काय होतंय का बघा याचं...?? सगळ्या तपासण्या पाहिल्या , रूग्णाला कॅन्सर होता,बरा होण्यासारखा होता, पण औषधांऐवजी शस्रक्रियेची गरंज होती...आजवर कोणत्याही डाॅक्टरने स्पष्ट शब्दांत रोग समजावूनदेखील सांगितला नव्हता.. नुसत्या तपासण्या आणि असंबद्ध औषधांचा भडिमार...थोडक्यात काय तर पैसे काढायची कामं...
मी पुढे काही म्हणण्याआगोदर तो स्वतःच मला म्हणाला ,सर कशामुळे होऊ शकतो हा कॅन्सर..?? म्हटलं दारू,तंबाखू काही व्यसन आहे का...?? दारू शब्द ऐकताच मोठ्या भावाने लहान भावाकडे बघितलं व लहान भावाची मान आपसुक खाली गेली...मग डोक्यावरील टोपी हातात घेऊन मोठा भाऊ म्हणाला,सर हा माझा छोटा भाऊ लक्ष्मण...लहानपणापासून खूपच अॅक्टीव,मी चौथीत शाळा सोडून शेती धरली, पण याचं लक्ष ना शाळेत ना शेतीत.. गावातील ग्रामपंचायत,पतसंस्था,पंचायत समिती सगळ्या राजकारणात हा ईतरांच्या पुढे,मग काय राजकारण्यांसोबत ऊठबस,त्यातून दारू,बिडी,सिगारेट सगळी व्यसनं...मी काही बोललो तर मलाच वेड्यात काढणार,तुला काय कळतंय...?? तू गप् बस...!! धाकट्या भावाबद्दल ईतक्या कळकळीने बोलणार्या त्याचं खरंच मला खूप आश्चर्य वाटलं काही क्षण...
त्याचं सगळं आधी नीट ऐकून घेतलं आणि मग म्हटलं ,१॰॰% बरा होण्यासारखा आजार आहे.पण तात्काळ भरती करून शस्त्रक्रिया करावी लागेल..जनरल वाॅर्ड घेतला तर ईतका खर्च,सेमी प्रायवेट,प्रायवेट आणि डिलक्स वाॅर्ड घेतला तर साधारण अमूकअमूक ईतका खर्च येईल..." सर जनरल वाॅर्डमधेच करा " ईतकावेळ शांत बसलेला त्याचा छोटा भाऊ पहिल्यांदाच मधे बोलला...तसा थोरल्या भावाने कचकन त्याचा हात दाबला आणि म्हणाला " थांब,तुला काय कळतंय....??"..म्हणाला ," सर जनरल वाॅर्डमधे कसं ईतरही रूग्ण असणार,याला सवय नाही दवाखान्याची,पहिलंच आजारपण,त्यातसुद्धा ऐवढा मोठा आजार...ऊगाच ईतरांना बघून हिंमत हरून जाईल बिचारा...काय जातील चार पैसे जास्त पण प्रायवेटमधेच करा....पैशांचं मी बघतो काय करायचं ते...." मी पुन्हा ऐकदा समजावणीच्या सुरात म्हटलं डाॅक्टर किंवा ऊपचारांमधे अजिबात काही फरंक पडणार नाही ,बघा विचार करा...तसा तो निश्चित स्वरांमधे म्हणाला," नक्की आहे सर,पैशांचं मी बघतो तुम्ही प्रायवेटमधेच करा...." मी म्हटलं ठीक आहे..
तो ऊठून जाता जाता मी त्याला थांबवत फक्त ऐकंच प्रश्न विचारला,हा तुमचा सख्खा धाकटा भाऊ आहे का...?? तसा थोरल्या भावाआगोदर धाकटा भाऊ हात जोडून म्हणाला "होय साहेब" तरूणपणी कधीच शेतात गेलो नाही,अंगात रग होती तेंव्हा राजकारण्यांची ऊठबस करीत बसलो,नको ती व्यसनं लावून घेतली आणि त्याचीच ही शिक्षा म्हणायची..मी तर जगायची आशाच सोडली होती,पण हाच हाताला धरूनओढून घेऊन आला...पाच दिवस पुराच्या पाण्यामुळे गावाकडची वाहतूक बंद आहे..आज सकाळी पहिली बस निघाली त्यात कोंबून आणला मला..." म्हटलं ठीक आहे,भरती व्हा...!! भेटतो संध्याकाळी
भावाभावाच्यांतलं ईतकं प्रेम आजच्या घडीला दुर्मिळंच नाही का...??नाहीतर जमिनीच्या छोट्याशा तुकड्यासाठी भांडणारे,ऐकमैकांना अद्वातद्वा बोलणारे आपण अनेक बघितले...आज हे सगळं लिहायचं कारण म्हणजे,आज लक्ष्मण डिश्चार्च झाला...अगदी खणखणीत तुमच्या आमच्यासारखा बरा होऊन तो घरी गेला...तो लढला,त्याने रोगाशी दोन हात केले...त्यात आम्हा डाॅक्टरांचा जो काही खारीचा वाटा असेल तो असेल, पण कामी आलेली पुण्याई मात्र केवळ त्याच्या मोठ्या भावाचीच...घरी जाताना लक्ष्मणच्या चेहर्यावर जे समाधान होतं त्याहून अधिक आनंद त्याच्या "थोरल्या" भावाच्या चेहर्यावर होता..
काही काही माणसांचा साधेपणा मला आयुष्यात खरंच खूप अचंबित करतो...त्यांच्या साधेपणातून मला आयुष्यात बरंच काही शिकता येतं आणि अशी खास लोकं माझ्यासमोर आली की त्यांना जवळून पाहताना व अनुभवताना मी त्यांच्यातल्या चांगल्या गोष्टी स्वतः अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्नही करतो...कधीकधी मला वाटतं या आपल्या अत्याधुनिक शिक्षणपद्धतीमुळे आयुष्यातील छोट्या छोट्या अल्हाददायी गोष्टींचा आनंद घेण्याची आपली क्षमताच नष्ट झालीये किंवा हळूहळू लोप पावतिये...म्हणजे ऐखाद्या गाईचं तोंड बांधून तिला कुरणामधे सोडल्यावर तिची कशी अवस्था होईल ना अगदी तशीच काहीशी अवस्था आपली झालीये...या अशा स्वच्छंदी,निष्पाप व निरागस लोकांना पाहिलं की खरंच हेवा वाटतो मला यांचा...
माणसाला आनंदी रहायला अंबानीं ईतका पैसा लागत नसतो,ना त्यासाठी साधू बनून हिमालयात जायची गरंज भासते.. अडचणीच्या काळी आपल्या तत्वांशी,मतांशी व आईवडिलांनी दिलेल्या शिकवणुशी तडजोड न करण्याची कसरत जमली की झालं....
-©- निरागस