Friday, 24 February 2017

प्रेम करावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं

"....जागतीक प्रेम दिवस येऊ घातलाय काही दिवसांवर...मांडा बाजार भावनांचा..विकायला काढा तुमच्या आतली घालमेल..लपवा तुमची वासना लाल कपड्यांमधे आणि ढीगभर गुलाबांमधे...ज्याचं गिफ्ट मोठं त्याचं प्रेम मोठं मानणारी ही आमची पिढी प्रेम पैशात मोजते आजकाल..शब्दांमधून प्रेम व्यक्त करणारी आमच्यासारखी लोकं हवेत कुणाला...?? अवघड होत चाललंय एकंदरीत सगळंच..जिकडे बघावं तिकडे प्रेमाचं ओंगाळवाणं प्रदर्शन..प्रेम ही सुप्त,म्रुदू भावना राहिलिच नाही मुळी...
                   नक्की काय आहे प्रेमाची व्याख्या...?? कुणी ठरवली...?? हातात हात,गळ्यात गळा,पाण्यात पाय घालून बसणे म्हणजेच प्रेम असतं का..?? एखाद्या निवडक दिवशी ठरवून प्रेम करता येतं का...?? प्रेम कसं सूर्याच्या कवडशासारखं असावं घर लख्ख करणारं....प्रेम असावं मातीच्या रांजणासारखं दुसर्‍याला सुखावणारं...प्रेम असावं त्या दूरदेशात स्थाईक झालेल्या चंद्रासारखं स्वच्छ, निरागस..आणि प्रेम असावं भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं
                     पण या सगळ्या पुस्तकी गोष्टी आहैत आजच्या जगात,वेड्यात काढतात लोकं मला...कोणत्या जगात वावरतोस तू म्हणतात...?? कारण आजच्या जगात प्रेम केलं की हातावर tattoo काढावाच लागतो...किलोभर भेटवस्तू आणि ढीगभर गुलाब, तेही लाल रंगाचेच द्यावे लागतात...भूक नसताना केवळ दुसर्‍याचं मन राखण्यासाठी वेळी अवेळी घराबाहेर जेवावं लागतं,नको त्या नापसंत अभिनेत्यांचे चित्रपट बघावे लागतात...आणि हे नाही केलं की आम्ही गाढव...आम्ही खेडूत...आम्हाला नाही समजत प्रेम म्हणजे काय ते...
                      प्रेम करा अगदी प्रत्येकाने करा,हक्काने करा...पण त्याचा बाजार नका मांडू...त्याला एखाद्या दिवसापूरतं मर्यादित नका ठेऊ.त्याला पैशात,जातीपातीत नका तोलू...ऊतू नका जाऊ तर ओतून द्या स्वतःला प्रेमात...ईतकं प्रेम करा एखाद्यावर की तुमचं स्वत्व,तुमचा अहंकार,मत्सर,मीपणा सगळ्या वाईट गोष्टी त्यात संपून गेल्या पाहिजेत...
                        बोलून न दाखवता आईने जितकं प्रेम केलं तितकं प्रेम कोणी करेल का माझ्यावर..?? नुसतं प्रेम...कोणतीही अपेक्षा न बाळगणारं...कशाचीही मागणी न करणारं...आभाळाएवढं प्रेम...मला ठेच लागली म्हणून डोळ्यात पाणी आणणारं प्रेम...मला घरी  यायला ऊशीर झाला म्हणून वर्‍हाड्यांत येरझार्‍या घालणार्‍या बापाएवढं प्रेम...?? मला मांडीवर बसवून बिभीषणाची गोष्ट सांगणार्‍या माझ्या आजीएवढं प्रेम...करेल का कुणी...??


( तळटीप - आयुष्यात खुप सार्‍या गोष्टी एकाचवेळी सुरु असल्याने लिहायला थोडा वेळ झाला...ईतक्या अगणीत गोष्टी आहेत डोक्यात...सहा महिने सुट्टी घेऊन केवळ लिहायला बसलं तरीही वेळ कमी पडेल...आणि वेळ पुरला तरी शब्द मात्र नक्कीच कमी पडतील..)


                      

No comments:

Post a Comment