Friday, 31 March 2017

शब्द


देवांचे गुणगाण गाणारे शब्द, असुरांची मिमांसा करणारे शब्द,

मायेची फुंकर घालणारे शब्द,वैशाख- वणव्यासारखे पोळणारे शब्द,

वाल्याचा वाल्मिकी करणारे शब्द, क्षणार्धात कर्णाला सामान्य करणारे शब्द,

आकाशाचं मोजमाप करणारे शब्द,चंद्रतार्‍यांशी लाघवी बोलणारे शब्द,

वार्‍याला बांधून घालणारे शब्द,पालापाचोळ्याला दिशा दाखवणारे शब्द,

लेकराला साद घालणारे शब्द,  मनातून हरलेल्याला धीर देणारे शब्द,

चंद्राला मोहक बनवणारे शब्द,सुर्याला कुरूप म्हणून हिणवणारे शब्द,

आईची माया ऊलगडणारे शब्द,बापाच्या काळजात डोकावणारे शब्द,

झरा,पाणी,वार्‍याची झुळूक,सूर्याचा कवडसा,म्रुदगंध या व ईतर अनैक खर्‍या खोट्या कल्पनाविलासांना प्रत्यक्षात आणणारे शब्द आणि शब्दंच...!!
                    

                                    -©- निरागस


Tuesday, 21 March 2017

डाॅक्टर..!! डाॅक्टर..!!

" लोकं मला विचारतात , तू निषेध का नाही करत डाॅक्टरांच्या मारहाणीचा..?? का नाहि लिहित यावर..?? का नाही बोलत यावर..?? म्हणून लिहायला घेतलं..!! तटस्थपणे लिहिणं अपेक्षित आहे पण तसं न करता मुद्दाम डाॅक्टर म्हणून आत्मपरीक्षण करून लिहितोय... बघा पटतंय का..!!
                    स्वतः डाॅक्टर असूनदेखील मी या मारहाणीच्या गोष्टी गांभीर्याने घेत आलेलो नाही ..कारणे अनेक आहेत...पहिलं म्हणजे सरकारलेखी कुचकामी असलेले आपले कायदे., प्रत्येक कायद्याला असलेली पळवाट आणि दुसरं म्हणजे या सगळ्या घटना म्हणजे लोकांच्या मनात डाॅक्टरांविरोधात असलेल्या संतापातून ऊद्भवलेला प्रतिकात्मक विरोध असल्याने , केवळ मोर्चे काढून,निषेध व्यक्त करून,कायदे कडक करून हा विषय सुटण्यातला नाही याचं मला ऊशीराने का होईना पण झालेलं आकलन..
                           वीस वर्षांपुर्वी डाॅक्टर म्हणजे निर्विवाद देव होता..त्याच्यावर लोकांचा विश्वास होता..डाॅक्टरचा शब्द प्रमाण मानला जात होता..मग मागील वीस वर्षात डाॅक्टरची पत ईतकी कशी घसरली...?? कारण डाॅक्टरांनी आपल्या ज्ञानाचा बाजार मांडला...रूग्ण आणि डाॅक्टर यांमधे पैसे सोडून दुसरं नातंच तयार होणं बंद झालं..भाव- भावना,विचारपूस, आपुलकी या गोष्टी केंव्हाच मागे पडल्या आणि या सगळ्या गोष्टींची जागा घेतली पैशाने..मग यातून नवीन नवीन मोठमोठाले दवाखाने निघू लागले...दवाखाने कुठले.. लोकांच्या आजाराची,त्यांच्या भीतीची कुचंबणा करणारे अशक्य असे कत्तलखाने निघू लागले...लोकांना छोट्यामोठ्या गोष्टींसाठी घाबरवून त्यांच्याकडून पैसे ऊकळले जाऊ लागले...अर्थात लोकांसाठी निस्वार्थिपणे झटणारी चांगल्या डाॅक्टरांची एक सुपीक जमात आजही अस्तित्वात आहे..पण या ईतर व्यापार्‍यांच्या झगमगाटात ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे....
                            मग ईतके पैसे ओतूनदेखील परिणामकारक ऊपचार मिळेनासे झाले,रोग बरा झाला तरी मानसिक समाधान मिळेणासं झालं..यातून येणारं नैराष्य,आगतिकता यातून डाॅक्टरांचं जनमानसातलं चित्र बिघडू लागलं...मग हा वर्षानुवर्षे दबलेला असंतोष कसा बाहेर पडणार..?? एव्हाना डाॅक्टर आपलं देवपण गमावून बसला होता...मोठमोठाले डाॅक्टर असंतोष बोलून दाखवायला,शंका निरसन करायला ऊपलब्ध नसल्याने, सरकारी दवाखान्यात ऊपलब्ध होणार्‍या त्या गरीब बिचार्‍या junior डाॅक्टरांवर सगळा राग बाहेर पडू लागला..राग व्यक्त करायची प्रत्येकाची कुवत आणि ताकद वेगवेगळी असल्याने अस्रुजनशील लोकांकडून मारहाणीचे प्रकार घडू लागले...
                          आता दुसरी बाजू,सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचं कामकाज माहिती नसणार्‍यांनी एकदा त्याला अवश्य भेट द्या..mbbs करून पुढील शिक्षण घेणारा डाॅक्टर तिथे गाढवासारखं काम करत असतो,त्याला त्याबदल्यात क्षुल्लक मोबदला दिला जातो..ऐका खोलीत दहा दहा,पंधरा पंधरा डाॅक्टर कोंबले जातात,कित्यैकांना झोपायला बैडदेखील पुरवले जात नाहीत,कामाच्या तासांबद्दल तर न बोललेलंच बरं..,चार चार दिवस यांना झोपायला वेळ मिळंत नाही,सकस आहार मिळंत नाही,आंघोळीला पाणी मिळंत नाही..,प्रत्यैक डाॅक्टरला करावं लागणारं वैयक्तिक काम हे त्याच्या कमाला मर्यादेपेक्षा कित्येक पटीने जास्त असतं...कामाच्या या बोजात ईतरांच्या आरोग्याची काळजी घेणारा डाॅक्टर शारिरीक व मानसिक द्रुष्ट्या स्वतःमात्र खंगला जातो..आणि अशा डाॅक्टरकडून आपण एखाद्या superhero सारखं चोवीस तास दूध देणार्‍या गाईसारखं कामाची अपेक्षा करतो..जे कागदावरदेखील शक्य नाही...,!!
                          बरं नुसते प्रश्न निर्माण करून काय ऊपयोग..?? त्यांची ऊत्तरदेखील सुचवतो..
१ ) सरकारी आणि खाजगी रूग्णालयं दोघांमधली तफावत कमी केली गेली पाहिजे..खाजगी रूग्णालयांच्या मनमानी कारभारावर सरकारने चाप आणला पाहिजे,
२) अत्यावश्यक सेवा जसं की बाळंतपण,काही अत्यावश्यक शस्रक्रिया यांच्या किंमती सरकारने नियमित करून द्याव्यात...आणि त्या स्वतःच्या नियंत्रणात ठेवाव्यात जेणेकरून सरकारी दवाखान्यांमधली अनावश्यक गर्दी कमी होईल,आणि गरीबातल्या गरीब लोकांपर्यंत सर्व वैद्यकीय सुविधा पोचवता येतील...
३) वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढविण्यात यावी...जास्तीत जास्त डाॅक्टर तयार करून डाॅक्टर पेशंट तफावत कमी होण्याच्या द्रुष्टीने पावले ऊचलावीत..
४) डाॅक्टरांना योग्य वेतन व ईतर सुविधा पुरविण्यात याव्यात,प्रसंगी कोणताही अनुचित प्रकार घडला तरी डाॅक्टरांच्या संपूर्ण सुरक्षेची हमी सरकारने घ्यावी
५) शेवटचं आणि सगळ्यात महत्वाचं..!! डाॅक्टरांच्या अभ्यासक्रमात लोकांशी कसं बोलावं,त्यांना कसं हाताळावं,ऐखादी अप्रिय घटना त्यांना कोणत्या भाषेत,कोणत्या वेळी सांगावी या सगळ्या बाबींचा समावेश केला गेला पाहिजे..नुसतेच पुस्तकी किडे बनून निघणारे डाॅक्टर सामाजिक आरोग्य कधीच सुधारू शकणार नाहीत..त्यांना जबाबदारीचा,सामाजिक आत्मियतेचा पैलू पाडणारं वैद्यकीय शिक्षण आपल्याला  तयार करावं लागेल...

( निषेध करणार्‍यांनी नक्कीच निषेध करावा, पण त्यामागील मूळ कारण जाणून न घेता नुसतीच स्वतःची बाजू ऊचलून धरणं डाॅक्टरांसारख्या वैचारीक जमातीला शोभून दिसतं का..?? याचा दूरवर कुठेतरी विचार होण गरजेचं आहे...कित्येक डाॅक्टरांच्या भावना दुखावतीलही कदाचित...त्यांना एवढंच सांगतो..prevention is better than cure हा मूलमंत्र आपणंच दिलाय ना जगाला...!! )
                                 -©- निरागस


Sunday, 19 March 2017

आई

" आई म्हणजे ऊगवतीचा सूर्य , 
                                 रात्रीचा चंद्र..

आई म्हणजे समुद्राचं खारेपण , 
                                आभाळाचं भारीपण..
    
आई म्हणजे लहानग्याची मस्ती, 
                                पैलवानाची कुस्ती..

आई म्हणजे पाऊस ओलाचिंब,
                                आरशातलं प्रतिबिंब..

आई म्हणजे भरलेला पाण्याचा घडा,
                                प्राजक्ताचा सडा

आई म्हणजे जीवनातला श्वास,
                                सार्‍या जगाहुनी खास

आई म्हणजे शिवबाची जिजाऊ,
                                घायाळ झालेला जटायु

आई म्हणजे विस्तवातली धग, 
                                न संपणारी अंगातली रग

आई म्हणजे आकाशातलं ईंद्रधनु,
                               प्रत्यक्षातली कामधेनू

आई म्हणजे गरीबाची काटकसर,
                               साडीवरली कलाकुसर

आई म्हणजे शेतकर्‍याचं आटलेलं रक्त,
                               विठ्ठलाचा भक्त

आई म्हणजे निरभ्र आकाश,
                               कळेल सर्वांना यथावकाश "
             
                             -©- निरागस


Wednesday, 15 March 2017

माझी माय

           "  किती लिहायचं आणि काय काय म्हणून लिहायचं..!!! ईतक्या मोठमोठ्या लोकांनी ईतकं सारं लिहून ठेवलंय.. त्यात भर म्हणून मी एक छोटासा लेखक काय लिहिणार..?? कित्यैक दिवस मनात होता विषय, पण खरंच हिम्मतंच होत नव्हती..विषयंच ईतका मोठा, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा..आई !! रोज आठवण आली की बोलतो तिच्याशी...पण आज आठवण आली आणि लिहायला बसलो, तिच्याविषयी...!!
              चार दिवस दाढी नाही केली की मैत्रिण सांगते, अरे किती विचित्र दिसतोयस तू..!! किती पोट वाढलंय तुझं...!! ह्या पॅंटवर हा शर्ट कुणी घालतं का...?? पण आईचं लक्षंच नाही गेलं कधी या गोष्टींकडे..तिने वाढलेलं पोट,वाढलेली दाढी कधीच नाही बघितली..तिने फक्त प्रेम केलं..मनापासून..!! निखळ,स्वच्छ,नितळ प्रेम...
                 सगळं कसं आजही डोळ्यासमोर आहै...रडायचो खूप लहाणपणी..रात्री अपरात्री..मग ती कणकेच्या गोळ्याचा गणपती बनवून द्यायची..मी तेवढ्यापुरता शांत बसायचो,त्याच्याशी खेळता खेळता त्याची सोंड मोडली की पुन्हा रडु लागायचो..!! मग दुसरं काहीतरी करायची..आजही असंच चालू असतं..विषय बदलले संदर्भ बदललै पण भावना तीच,प्राथमिकता तीच आणि असं करता करता तिच्या आयुष्याची एक दोन नव्हे तर तीस वर्ष तिने माझ्यावर खर्च केली...कोणतीही तक्रार न करता...कोणताही हिशोब न ठेवता..आणि तिचा हिशोब म्हणजे काय हो कितीही चुकता केला तरी बाकी शुन्यचं...!! छे..!! किती वेडा होतो मी..रडायचो वैड्यासारखं...किती त्रास झाला असेल तिला...किती झोपमोड झाली असेल बिचारीची...आज कळतं..आठवतं.. आणि रडूही येतं...!!
                  मग मोठा झालो,.ईतरांसाठी..आईसाठी मात्र मी तोच असतो तिचा पदर धरून चालायला शिकलेला...!! तिच्या हातांनी भरवलेलं खाणारा...आज  डाॅक्टर झाल्यावरदैखील रस्ता पार करताना आवर्जून सांगते मला.., दोन्ही बाजूला नीट बघ..,गाड्या येत नसतील तरंच जा पलीकडे...आणि मी पलिकडे पोचेपर्यंत बघत रहाते जीव मुठीत घेऊन माझ्याकडे एकटक...कुठून यैतं एवढं प्रेम..?? समुद्र आटेल एकवेळ पण तिची माया कधीच आटणार नाही..!!
                  परवा घरातून परत येताना मीच विचारलं..कशी आहेस तू म्हणून..!! आणि रडायलाच लागली ती..मग रडणं आवरंत म्हणाली, जाता जाता असले अवघड प्रश्न नको विचारत जाऊस..काय बोलू मी तरी..?? कोण लहान होतं ??मी की ती ?? काहीच कळायला मार्ग नाही..रेल्वे स्टेशनपर्यंत सोडायला आली मला..जाताना नेहमीप्रमाणे माझ्या कपाळावर बोटं मोडत म्हणाली,काळजी घे..आणि तोपर्यंत कसबसे आवरलेलै ते दोन थेंब माझ्या डोळ्यांतून खाली टपकले..येतो मी !! म्हणून पाठ फिरवली आणि मागे वळून बघितलंच नाही परत..कारण वळून पुन्हा तिच्या डोळ्यांत बघितलं असतं तर अश्रूंचा पाऊस पडला असता...रात्रभर बसून नुसता विचार केला..हे पांग फेडता येतील का हो ?? कधीच नाही..!! शक्यच नाही..
                    माझीच नाही प्रत्यैक लहान मोठ्याची आई अशीच असते आपल्या लेकरावर जीव ओवाळून टाकणारी..तिच्या प्रेमाची मोजदाद करायला, त्याची परतफेड करायला दहा जन्म पुरणार नाहीत..जगातली सगळी ऐश्वर्य एका बाजूला आणि आईची माया एका बाजूला..आई जोवर आहे तोपर्यंत मिळणारा प्रत्येक क्षण तिच्या सहवासात,सेवेत घालवा..मैत्रिणीसाठी ,मुठभर पैशांसाठी,नोकरीसाठी आईपासून दुरावू नका..कारण ती जेव्हा निघून जाईल त्यावेळी रडण्याहून अधिक काही राहणार नाही हातात...!! जाता जाता फक्त एवढंच लिहिन...
    " आई म्हणजे ऊगवतीचा सूर्य , रात्रीचा चंद्र..
  आई म्हणजे समुद्राचं खारेपण , आभाळाचं भारीपण..
     आई म्हणजे लहानग्याची मस्ती, पैलवानाची कुस्ती..
आई म्हणजे पाऊस ओलाचिंब,आरशातलं प्रतिबिंब.."
                              
                                             -©- निरागस


Wednesday, 1 March 2017

तरीहि पहिल्या पावसात आठवण निघतेच



तरीहि पहिल्या पावसात आठवण निघतेच...

वार्‍यावर ऊडणार्‍या तुझ्या केसांची,त्यामधे गोवलेल्या चाफ्याची....
तुझ्या गोड,स्मित हास्याची आणि तुझ्या तिरकस नजरेची....


तरीहि पहिल्या पावसात आठवण निघतेच...

सायकलवरून तुझ्यामागे घातलेल्या येरझार्‍यांची,तुझ्या हटकण्याची....
तुझ्या लडिवाळ रागवण्याची आणि तुझ्या नकळत नाक मुरडण्याची....


तरीहि पहिल्या पावसात आठवण निघतेच...

मुठीत पकडलेल्या काजव्यांची,तुझ्यासमवैत अवकाशातल्या तार्‍यांच्या मांडलेल्या हिशोबाची....
तुझ्या मिश्कील बोलण्याची आणि सदाबहार विनोदबुद्धिची....


तरीहि पहिल्या पावसात आठवण निघतेच...

तुझ्या आठवणीत बुडवलेल्या प्रत्यैक रात्रीची, अनवधानाने झालेल्या तुझ्या स्पर्शाची....
महिरूपी कंसासारख्या तुझ्या डोळ्यांची आणि त्या डोळ्यांत स्वतःचं अस्तित्व शोधणार्‍या माझी....
                             
    
                              ©- निरागस