Wednesday, 15 March 2017

माझी माय

           "  किती लिहायचं आणि काय काय म्हणून लिहायचं..!!! ईतक्या मोठमोठ्या लोकांनी ईतकं सारं लिहून ठेवलंय.. त्यात भर म्हणून मी एक छोटासा लेखक काय लिहिणार..?? कित्यैक दिवस मनात होता विषय, पण खरंच हिम्मतंच होत नव्हती..विषयंच ईतका मोठा, सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा..आई !! रोज आठवण आली की बोलतो तिच्याशी...पण आज आठवण आली आणि लिहायला बसलो, तिच्याविषयी...!!
              चार दिवस दाढी नाही केली की मैत्रिण सांगते, अरे किती विचित्र दिसतोयस तू..!! किती पोट वाढलंय तुझं...!! ह्या पॅंटवर हा शर्ट कुणी घालतं का...?? पण आईचं लक्षंच नाही गेलं कधी या गोष्टींकडे..तिने वाढलेलं पोट,वाढलेली दाढी कधीच नाही बघितली..तिने फक्त प्रेम केलं..मनापासून..!! निखळ,स्वच्छ,नितळ प्रेम...
                 सगळं कसं आजही डोळ्यासमोर आहै...रडायचो खूप लहाणपणी..रात्री अपरात्री..मग ती कणकेच्या गोळ्याचा गणपती बनवून द्यायची..मी तेवढ्यापुरता शांत बसायचो,त्याच्याशी खेळता खेळता त्याची सोंड मोडली की पुन्हा रडु लागायचो..!! मग दुसरं काहीतरी करायची..आजही असंच चालू असतं..विषय बदलले संदर्भ बदललै पण भावना तीच,प्राथमिकता तीच आणि असं करता करता तिच्या आयुष्याची एक दोन नव्हे तर तीस वर्ष तिने माझ्यावर खर्च केली...कोणतीही तक्रार न करता...कोणताही हिशोब न ठेवता..आणि तिचा हिशोब म्हणजे काय हो कितीही चुकता केला तरी बाकी शुन्यचं...!! छे..!! किती वेडा होतो मी..रडायचो वैड्यासारखं...किती त्रास झाला असेल तिला...किती झोपमोड झाली असेल बिचारीची...आज कळतं..आठवतं.. आणि रडूही येतं...!!
                  मग मोठा झालो,.ईतरांसाठी..आईसाठी मात्र मी तोच असतो तिचा पदर धरून चालायला शिकलेला...!! तिच्या हातांनी भरवलेलं खाणारा...आज  डाॅक्टर झाल्यावरदैखील रस्ता पार करताना आवर्जून सांगते मला.., दोन्ही बाजूला नीट बघ..,गाड्या येत नसतील तरंच जा पलीकडे...आणि मी पलिकडे पोचेपर्यंत बघत रहाते जीव मुठीत घेऊन माझ्याकडे एकटक...कुठून यैतं एवढं प्रेम..?? समुद्र आटेल एकवेळ पण तिची माया कधीच आटणार नाही..!!
                  परवा घरातून परत येताना मीच विचारलं..कशी आहेस तू म्हणून..!! आणि रडायलाच लागली ती..मग रडणं आवरंत म्हणाली, जाता जाता असले अवघड प्रश्न नको विचारत जाऊस..काय बोलू मी तरी..?? कोण लहान होतं ??मी की ती ?? काहीच कळायला मार्ग नाही..रेल्वे स्टेशनपर्यंत सोडायला आली मला..जाताना नेहमीप्रमाणे माझ्या कपाळावर बोटं मोडत म्हणाली,काळजी घे..आणि तोपर्यंत कसबसे आवरलेलै ते दोन थेंब माझ्या डोळ्यांतून खाली टपकले..येतो मी !! म्हणून पाठ फिरवली आणि मागे वळून बघितलंच नाही परत..कारण वळून पुन्हा तिच्या डोळ्यांत बघितलं असतं तर अश्रूंचा पाऊस पडला असता...रात्रभर बसून नुसता विचार केला..हे पांग फेडता येतील का हो ?? कधीच नाही..!! शक्यच नाही..
                    माझीच नाही प्रत्यैक लहान मोठ्याची आई अशीच असते आपल्या लेकरावर जीव ओवाळून टाकणारी..तिच्या प्रेमाची मोजदाद करायला, त्याची परतफेड करायला दहा जन्म पुरणार नाहीत..जगातली सगळी ऐश्वर्य एका बाजूला आणि आईची माया एका बाजूला..आई जोवर आहे तोपर्यंत मिळणारा प्रत्येक क्षण तिच्या सहवासात,सेवेत घालवा..मैत्रिणीसाठी ,मुठभर पैशांसाठी,नोकरीसाठी आईपासून दुरावू नका..कारण ती जेव्हा निघून जाईल त्यावेळी रडण्याहून अधिक काही राहणार नाही हातात...!! जाता जाता फक्त एवढंच लिहिन...
    " आई म्हणजे ऊगवतीचा सूर्य , रात्रीचा चंद्र..
  आई म्हणजे समुद्राचं खारेपण , आभाळाचं भारीपण..
     आई म्हणजे लहानग्याची मस्ती, पैलवानाची कुस्ती..
आई म्हणजे पाऊस ओलाचिंब,आरशातलं प्रतिबिंब.."
                              
                                             -©- निरागस


1 comment:

  1. कसा बसा आवंढा गिळायचा प्रयत्न केला पण शेवटी डोळ्यातून पाणी आलं.

    ReplyDelete