Wednesday, 23 November 2016

..मी माझा माझ्यासाठी...



                    मी माझा माझ्यासाठी

मी चित्रं काढत नाही सहसा..,,नुसत्याच रैघोट्या मी मारतो... 
त्यात सुखाचे रंग भरायचे की दुःखाचे या नेहमीच्या वादात थकून मी जातो

मी रडत नाही सहसा...,नुसताच भिंतीकडे रोखून बघत बसतो... 
त्या ठिबकलेल्या आसवांची किंमत  कळेल की नाही जगाला याचंच गणित मी मांडत बसतो

मी वाद घालत नाही सहसा....नुसतीच बोटं मी मोडतो .
बोचरी शल्य मनात साचवून बिछान्यावर मी पहुडतो...

मी माया करत नाही कुणावर सहसा नुसताच हसतो स्वतःशी.....
या आपुलकीने  बांधला नाही जायचं  मरेपर्यंत मला लोकांशी....

मी प्रवासदेखील करत नाही सहसा...बाहेर जायला मी घाबरतो
बाहैर गेलेली पाऊलं माघारी वळतील की नाही या भीतीने स्वतःला बांधून मी घालतो




                                                                                                                        - निरागस




"..माझ्या आठवणीतला शेवटचा मास्तर..."



"..mbbs ला प्रवेश घेतल्यावर college चा dean कोण आहे हे माहिती पडायच्या आगोदर मास्तरचं नाव माहिती पडलं...पहिलं वर्षभर मास्तरकडं नजर वर करून बघायची हिंम्मत नव्हती १॰॰ मुलांपैकी एकाचिही...शेवटी मास्तर कंटाळून स्वतःच सांगायचा अरे माझ्याकडे बघून बोल...मास्तर सुरूवातीपासूनच चारचौघांपेक्षा वेगळा होता रात्री ऊडणार्‍या स्वयंप्रकाशी काजव्यासारखा..
              मास्तर म्हणजे दोन हात दोन पाय असणारं चालतं फिरतं महाविद्यालय होतं...काही काम घेऊन जावा , दोन मिनिटांत काम करणार...मास्तरची ओळख पार त्या security guard पासून dean पर्यंत..पण आम्हीच घाबरायचो जायचोच नाही कधी....असंच एकदा पाणी भरायला म्हणून मास्तरच्या हाॅस्टेलला गेलो आणि मास्तरच्या तावडीत सापडलो..मास्तरनं रुमवर बोलावून घेतलं...मास्तरचा दुसर्‍या दिवशी मेडिसीनचा पेपर होता...आत गेल्या गेल्या मास्तरनं सांगितलं अभ्यास हाताबाहेर गेलेला आहे म्हणून गप्पा मारायला बोलंवलंय...आणि गप्पा सुरू झाल्या...गप्पांना काहि विषय नव्हता..म्हणजे पु.लं.देशपांडे क्रिकेट का खेळले नाहित पासून ते तू डाॅक्टरंच का झालास यापैकी मास्तरला जो आवडेल तो विषय..आणि मास्तरला जी पटतील ती ऊत्तरं...पण मजा आली...मधेच भिंतीवर लक्ष गेलं तर  zinadin zidane चं पोस्टर आणि त्यावर मास्तरनं स्वतः लिहिलेली कविता ( my religion is zizouism zizouism )...एकंदरित काय तर मास्तर म्हणजे माझ्या आकलन शक्तिच्या पलिकडचा प्रकार होता....त्या भेटीनंतर मास्तर कुठे हरवला कळलंच नाही...
           ...नंतर एकेदिवशी अचानक मास्तर पुण्यात भेटला...मास्तर व मी दोघेही एकाच परीक्षेसाठी आलो होतो..मास्तरला म्हटलं मास्तर अभ्यास कसा करू सांग...मास्तर परीक्षा संपल्यावर हाॅटेलात घेऊन गेला...आधि खायला घातलं नंतर स्वतःची वही काढली आणि आपुलकीने समजवायला लागला...काय गरज होती मास्तरला...?? दरवर्षि १॰॰ मुलं जात असतील मास्तरच्या हाताखालनं...पण माणसाचा स्वभाव असतो...आणि हाच मास्तरचा स्वभाव मास्तरला मोठं करून जाईल एकदिवस...त्यादिवशीनंतर मास्तर परत हरवला तो आजतागायत सापडलाच नाही...,
                   ..मास्तर कुठे आहे काय करतो काहीच माहिती नाही...प्रुथ्वीवर आहे की नेपच्युनवर जाऊन स्थाईक झालाय हेदेखील माहिती नाही...आमचा मास्तर आहे समुद्राच्या रेतीसारखा हातात न येणारा...असो..पण तो जिथं कुठं असणार, माणसं जोडत असणार..जग बदलवत असणार....."

                                                                              -निरागस



"...माझ्या आठवणीतला दुसरा मास्तर.."



"..परवा मास्तरची आठवण आली म्हणून मास्तरला मी लिहिलेली कविता पाठवली...मास्तरचा reply आला .. सिंधु सेमी फायनल जिंकली...मी म्हटलं अभिनंदन...मास्तर म्हटला ऊद्या फायनल आहे मी बघू नाही शकणार पण तू नक्की बघ...मी विचारलं काय आॅपरेशन वगैरे आहे काय..?? मास्तर म्हटला क्रिकेट मॅच आहै माझी....पण मला अजिबात आश्चर्य वाटलं नाही...कारण आमचा मास्तर असाचं आहे सुरुवातीपासून...मास्तरच्या अंगात चार सचिन तेंडुलकर आणि दोन गोपीचंद भरलेत...
               ...मुंबईचं तिकीट काढावं आणि कोल्हापुरला जाऊन पोचावं तसा आमचा मास्तर चुकून डाॅक्टर झालाय...ईतक्या वर्षात मास्तरला मी कधीच मुलींबरोबर फालतू चकाट्या पिटताना बघितलं नाही..की परीक्षेचं अवास्तव टेंशन घेऊन दिवसभर पुस्तकात डोकं खुपसून बसलेलं बघितलं नाही..कधिही कुठेही भेटा खेळाचा विषय काढा,मास्तर एका पायावर तयार...mbbs ला आम्ही सगळे मिळून जेवढे sports points मिळवायचो तेवढे मास्तर एकटा खिशात घेऊन जायचा....क्रिकेट,फुटबाॅल,वाॅलीबाॅल,बॅडमिंटन...काहि सांगा सगळ्यात पहिला नंबर...मला कित्येकवेळा प्रश्न पडायचा अभ्यास कसं काय सांभाळतो मास्तर...?? नुसतं खेळत राहतो....पण आता कळतं सगळं..काहि नसतं अभ्यास वगैरे...सगळा गाढवपणा आहे...आजूबाजूला चाललेल्या चुकीच्या वाईट गोष्टींपासून दूर रहायचं असेल तर छंद जोपासावे लागतात आणि म्हणून मी लिहितो आणि म्हणूनच मास्तर खेळत असावा कदाचित....
                        ...मास्तर असंच खेळत रहा धातीफुटेपर्यंत...असंच हसत रहा आयुष्य संपेपर्यंत...मास्तरच्यात आणि आम्हा ईतरांच्यात एकच फरक आहे...आम्ही सगळे हाडा- मांसाची सामान्य माणसे आहोत.,तर मास्तर हाडांचा डाॅक्टर आणि आभाळाएवढा मोठा माणूस आहे...."

                                                                                       -निरागस



..माझ्या आठवणीतला पहिला मास्तर...


"..मास्तर Anup Subhash Bharati ईंटर्नशिपला होता..मी असेन mbbs च्या पहिल्या वर्षाला..GS (general secretory) च्या निवडणुका होणार होत्या त्यासंदर्भात माझा मित्र Bhushan Wankhede घेऊन गेलेला मला भेटायला..भुषण मास्तरचा पहिल्यापासूनचा मित्र..मी मास्तरबद्दल ऐकून होतो...प्रत्यक्ष भेटायची संधी आली नव्हती कधी....त्यावेळचं ईटर्न होस्टेल म्हण्जे रुग्णांचा वाॅर्ड खाली करुन त्यात मधे चादरी पडदे टाकून तात्पुरत्या खोल्या तयार केलेल्या...पहिल्या वर्षाच्या मुलग्यासाठी ईंटर्न म्हणजे आजी म्या ब्रह्म पाहिल्याचा अनुभव...घाबरत घाबरत पायर्‍या चढत वर गेलो...प्रत्येक पायरीवर तोच रॅगिंग वाला intro,कुठून आलायस काय , करायला आलायस..कुणाला भेटायला आलायस वगैरे प्रश्नांची सरबत्ती झाली.चार मजले चालत चढायला तास लागला..पण मास्तरचं नाव सांगितलं की समोरचा गप्प...तेंव्हाच चुणूक लागली की आमचा मास्तर म्हणजे काय साधी गोष्ट नव्हती...होस्टेलवर कुणीच पुर्ण कपड्यात नव्हतं...मी भुषणला म्हटलं हे लोकं medicine कसं पास झाले असतील यार...?? यांना कसं लक्षात रहात असंल सगळं..,?? भूषण गप्प..तो पण वैतागला असेल एव्हाना...एवढ्यात तो एका रूम मधे घुसला आणि त्याच्या मागोमाग मी आत गेलो..आणि मास्तरला पहिल्यांदा बघितलं..,सडपातळ बांधा..अंगात पुर्ण formal dress..गळ्यात stethoscope...विंचरलेले केस असलेला मास्तर मेसच्या डब्याशी खेळत होता...डाळीतलं पाणी डाळ सांडू न देता काढायचा आटोकाट प्रयत्न चालू होता...भूषणने ओळख करून दिली मास्तरने पहिला घास खाता खाता चष्म्यातून एक कटाक्ष टाकला आणि म्हटला काय काम आहे...काम ऐकल्यावर म्हटला...एवढंच ना..?? करूया की....हातानंच बस म्हणला...कुठुन आलास वगैरे प्राथमिक चौकशी केली...धीर दिला...आपल्या internship चे चार पाच किस्से सांगितले आणि परत पाठवताना अभ्यास करा रे असं दरडावून सांगायला विसरला नाही...
                     ..आता मास्तर शिकून खूप मोठा मानसोपचारतज्ञ झालाय...लई मोठा डाॅक्टर झालाय पण माझ्या मनात मात्र तोच डाळीतून पाणी काढणारा मास्तरंच कोरला गेलाय...मास्तर विसरला असेल आमची पहिली भेट पण माझ्या आयुष्यात ती भेट कायम माझ्याबरोबर राहिल...." 


                                                                                                                                                                                       - निरागस




हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण....

                                     हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण....


लहानपण तेवढं बरं होतं...जे मागेल ते मिळत होतं..
दमून भागून सायंकाळी , लेकरु कुशीत आईच्या विसावत होतं..
नव्हता होत रोज रोज कुणाबरोबर तंटा..
सगळे प्रश्न संपायचे, जेंव्हा वाजायची शाळेची घंटा...

नाही राहिली ती गंमत..नाही राहिलं ते बालपण..
आता मात्र हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण...


पुस्तकांनी भरलेल्या या दप्तरात हरवलं माझं निरागसपण...
आता नाही सुटका , फसलो रे मित्रा तु पण आणि मी पण..
खेळण्यांची ,फुग्यांची नव्हे तर पुस्तकांची असते मोठ्यांची जत्रा...
मन माझं झालंय कासावीस अन् जीव झालाय माझा भित्रा..

नाहि राहिली ती ऊमेद नको झालंय हे तरुणपण
आता मात्र हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण...


नको त्या महागड्या गाड्या..,नको ती रोजची वर्दळ..
हरवत चाललाय बागेमधून चाफ्याचा तो दरवळ..
ऊत्तरं शोधता शोधता वर्ष चालली सरत...
कधीतरी येतील काहो आयुष्यातले हे दिवस परत..???

नाही राहिली आपसातली ती आपुलकी..नाही राहिलं ते आपलंपण..
आता मात्र हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण...


रोज शांततेच्या शोधात घराबाहेर मी निघतो...
भांबावलेल्या नजरेने आकाशाकडे मी बघतो..
सुर्यदेखील आजकाल माझ्याकडे बघून हसत नाही...
त्याला तरी काय दोष देणार..??..त्याचीच दुरावस्था माझ्याकडून बघवली जात नाही...

नाही राहिली ती ध्येयासक्ती , हाती ऊरलंय ते फक्त म्हातारपण
आता मात्र हवंय फक्त कागद,पेन आणि एकटेपण...
                                                                                
                                                                                            - निरागस


..जन्म निरागसचा...


                                                              ..जन्म निरागसचा...

                 ..आयुष्यात खुप ऊशीरा ऊघड्या डोळ्यांनी जग बघायला चालू केलं.विचारांची बरीच घालमेल सुरु झाली मनात.आजूबाजूला घडणार्‍या गोष्टींमधे पटणार्‍या कमी आणि न पटणार्‍याच जास्त होत्या..रडावं म्हटलं तरपौरुषत्व आडवं येत होतं.म्हणून जसं जमेल तसं लिहायला चालू केलं..स्वतःच्या नावाने लिहावं तर स्वतःच्या आवडीनिवडी,आवडत्या व्यक्ति,नावडत्या व्यक्ति यांचा नकळत लिखाणावर परिणाम पडायला लागला..

                           एकेदिवशी हाॅस्पिटलमधे थकून  बिछान्यावर कलंडलो...ऊठलो तेंव्हा डोक्यात नाव तयार होतं "निरागस"..ते कुठून आलं.?? कसं आलं..?? कुणामुळे आलं..?? हे त्या गणरायाला माहिती...आणि लिखानाला गती मिळाली...फेसबुकवर लिहिणं चालू केलं...हळूहळू लोकं कुजबुजायला लागली,बोलायला लागली,विचार करायला लागली...हेतू सफल झाला..
.
मित्रांनो ही लढाई आहै विचारांची विचारांशी..आणि या लिखाणाचा एकमेव ऊद्देश म्हणजे तुम्हाला अंतर्मुख करुन आयुष्यावर विचार करायला
लावणे..
                              
                                                                                                                                                                                                  निरागस
                                                                        
                              



                                                                              

Saturday, 19 November 2016

होय मी तुमच्यातलाच आहे...

                                                   होय मी तुमच्यातलाच आहे...

..माझे कित्येक मित्र रूसलेत माझ्यावर माझ्या लिखाणामुळे त्या सर्वांसाठी...

होय मी तुमच्यातलाच आहे...

काय करु करोडो रुपये कमावणार्‍या ऐशोआरामात जगणार्‍या तेंडुलकरला आमच्या अण्णा हजारेंआगोदर दिलेला भारतरत्न नाही पटत मला...

होय मी तुमच्यातलाच आहे...

काय करु व्यापम घोटाळा,गोध्रा कांड,बंगारु लक्ष्मण,अदानी अंबानी यांच्याकडे दुर्लक्ष करुन भाजपा सर्वश्रेष्ठ बिनचूक पक्ष आहे असं ईतरांसारखं नाही म्हणू शकत मी.

होय मी तुमच्यातलाच आहे...

काय करु लोकशाहीचा अतिरैक झालेल्या या देशात हाणामारी केल्याशिवाय कामंच होत नाहीत पटापटा म्हणून कधीमधी समर्थन करतो अशा पक्षांचं...

होय मी तुमच्यातलाच आहे...
काय करू देशापेक्षा व्यक्ति मोठी होणं नाही पटत मला म्हणून करतो मोदींच्या चुकीच्या न पटलेल्या धोरणांवर टीका... " 
                                                                     
                                                                     -निरागस

  
                                                                 

Tuesday, 15 November 2016

"..माणूस म्हणून जगण्यात काय राम ऊरला नाही..''


 
                                    "..माणूस म्हणून जगण्यात काय राम ऊरला नाही..''



वाटतं कधीकधी गोचीड व्हावं..बैलाच्या अंगावरली.. मनसोक्त रक्त प्यावं आणि कुणी साधी दखलदेखील न घ्यावी...

वाटतं कधीकधी कावळ्याचं पिल्लू व्हावं..आणि कोकिळेनेदेखील स्वतःच्या पिलासारखं आपल्यालादेखील जपावं...

वाटतं कधीकधी  व्हावं त्या माळावरल्या पिवळ्याशार धामणासारखं ... मध्यान्हाच्या ऊन्हात भररस्त्यात पहुडावं आणि डोळे वर करुन बघायची कुणाची हिम्मतही न व्हावी....

वाटतं कधीकधी व्हावं त्या घारीसारखं आणि ऊगाच त्या निरभ्र आकाशावर आपल्या पंखांनी रेघोट्या माराव्यात...

वाटतं कधीकधी त्या बाभळीसारखं ईतकं र्‍हाट व्हावं की ऊन पावसाचा सोस जाणवूच नये मुळी...

वाटतं कधीकधी व्हावं त्या चंद्रासारखं..आणि आपल्याकडे बघुन सगळ्या जगाने खुष व्हावं...

वाटतं कधीकधी वाळवी व्हावं आणि ही सगळी मानवी अस्प्रुश्यताच गिळून टाकावी...


''पण झालो दोन हात आणि दोन पायांचा, स्वतःचा परीघ स्वतःच ठरवून निरंतर त्याभोवती फिरणारा माणूस,

              श्या माणूस म्हणून जगण्यात काही राम ऊरला नाही..." 

                                                                                      
                                                                                                                                                                           निरागस